कोल्हापुरच्या पृथ्वीराज पाटलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्य पदकाची कमाई, रशियाच्या मल्लास लोळवले

कोल्हापूर,

कुस्तीगिरांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूरातील एका मल्लाने जागतिक स्तरावर विजयी कामगिरी केली आहे. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथील कुस्तीपटू पृथ्वीराज पाटील याने ज्युनिअर फ्री स्टाईल जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. त्याने 92 किलो वजनगटात रशियाच्या मल्लाविरोधात 2-1 अशा गुणाच्या फरकाने विजय मिळवला. पृथ्वीराजच्या या यशामुळे त्याचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

मंगळवार (17 ऑॅगस्ट) पासून रशियातील उफा मध्ये जागतिक कुस्ती स्पर्धा सुरू आहे. यामध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. कोल्हापुरातल्या देवठाणे या गावातील कुस्तीपटू पृथ्वीराज पाटील याने सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता. यात त्याने पहिल्या लढतीत यश मिळविले. मात्र दुसर्‍या लढतीत त्याला अपयश आले. त्यानंतर सलग तिसर्‍या आणि चौथ्या लढतीत बाजी मारत त्याने कांस्य पदकावर आपले नाव कोरले. जागतिक ज्युनिअर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत त्याने हे यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवाय कोल्हापुरातील कुस्ती प्रेमींमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.

पृथ्वीराज पाटील हा सध्या कोल्हापुरातल्या शिंगणापूर येथील शाहू कुस्ती केंद्रामध्ये सराव करत आहे. पृथ्वीराज वस्ताद जालिंदर पाटील, प्रशिक्षक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू आहे. तर उपमहाराष्ट्र केसरी संग-ाम पाटील, धनाजी पाटील, वडील बाबासाहेब पाटील, आजोबा मारुती पाटील यांचे या कुस्तीस्पर्धेत पाटील याला मार्गदर्शन लाभले. पृथ्वीराज याने यापूर्वी सुद्धा खेलो इंडिया सह ज्युनिअर आणि सिनियर कुस्ती स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!