पंतप्रधान मोदींची आहे एक पाकिस्तानी बहीण; गेली 26 वर्षं न चुकता मोदींना राखी बांधणारी ही महिला आहे कोण?
अहमदाबाद,
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक पाकिस्तानी बहिण गेल्या 26 वर्षांपासून दर राखी पौर्णिमेला त्यांना राखी बांधते. कमर जहां यांनी यंदादेखील मोदींसाठी एक सुंदर राखी तयार केली असून पंतप्रधान असणार्या आपल्या भावाला बांधण्यासाठी त्या आतूर आहेत. भावाबहिणीच्या प्रेमाचा संदेश या राखीवर लिहिण्यात आला असून मोदींनी हा बंधुभाव गेल्या 26 वर्षांपासून जपून ठेवला आहे.
कमर जहां यांचा जन्म पाकिस्तानातील असल्यामुळे त्यांना पाकिस्तानी म्हटलं जातं. मात्र त्यांचा विवाह भारतातील प्रसिद्ध चित्रकार मोहसीन शेख यांच्याशी झाला आहे. मोहसीन शेख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेकांचे जुने मित्र असून तरुण असल्यापासून ते एकमेकांना ओळखतात. मोहसीन शेख यांच्यामुळेच कमर जहां यांचा मोदींशी परिचय झाला आणि राखी बांधायला सुरुवात झाली.
26 वर्षांपूर्वी मोहसीन शेख हे कमर जहांसोबत नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यावेळी कमर जहांची विचारपूस करताना त्यांचा जन्म पाकिस्तानातील असून त्या लग्न होऊन भारतात आल्याचं समजल्यावर मोदींनी त्यांचा बहिण असा उल्लेख करत स्वागत केलं होतं. त्यावर कमर जहां यांनी भारतात आपला कुणीही भाऊ नसून तुम्हीच माझे भाऊ बनाल का, असा सवाल मोदींना केला होता. त्यावर मोदींनी हसतमुखाने आपला हात समोर करत त्यांच्याकडून राखी बांधून घेतली होती. तेव्हापासून दर वर्षी कमर जहां नरेंद्र मोदींना राखी बांधतात.
गेल्या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कमर जहां यांना मोदींना भेटणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पोस्टाने राखी पाठवली होती. यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे आपल्याला मोदींना भेटण्याची आणि त्यांना राखी बांधण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा कमर जहांना आहे.