जिल्ह्याला देण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट महिनाभरात पुर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
जालना,
यंदाच्या पावसाळयामध्ये विभागीय आयुक्तांकडून जालना जिल्ह्यास 1 कोटी 40 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक विभागाला देण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचे काटेकोरपणे नियोजन करुन येत्या महिनाभरात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पुर्ण करण्याबरोबरच वृक्ष लागवडीची माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वृक्ष लागवडीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकार्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, वाढते प्रदुषण रोखुन पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये वृक्षांची फार मोठी मोलाची भूमिका आहे. जालना जिल्ह्यातील वनक्षेत्राचे कमी असलेले प्रमाण वाढुन नैसर्गिकरित्या ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली असल्याचे सांगत सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात वृक्षलागवडीची गती अत्यंत संथ असल्याने यावर नाराजी व्यक्त करत जालना जिल्ह्याला वृक्षलागवडीचे देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला उद्दिष्ठ ठरवुन देण्यात आले आहे. देण्यात आलेले उद्दिष्ट हे येत्या एक महिन्याच्या कालावधीत पुर्ण झालेच पाहिजे, यादृष्टीने काटोकोरपणे नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी उपस्थित अधिकार्यांना दिले.
वृक्ष लागवड करताना वृक्ष लागवडीची माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणेही तेवढेच गरजेचे आहे. अनेक शासकीय कार्यालयामार्फत वृक्ष लागवड केल्यानंतर ऑनलाईन माहिती अपलोड करण्यात येत नाही. ऑनलाईन माहिती अपलोड करण्यासंदर्भात यापुर्वी सर्व संबंधित विभागांसाठी प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात आले असल्याचे सांगत माहिती अपलोड करण्यासंदर्भात काही समस्या, अडचणी असतील त्या संबंधित विभागाशी संपर्क साधुन त्यांचा निपटारा करुन घेण्यात याव्यात. वृक्ष लागवडीनंतर माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड होईल, याची नोंद घेण्याच्या सुचना देत विभागनिहाय वृक्ष लागवडीचा आढावाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी घेतला. उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन वृक्ष लागवडीची माहिती दिली. बैठकीस शासकीय यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.