काबूल येथून पळ काढताना तब्बल 4 कार आणि हेलिकॉप्टर भरून कॅश घेऊन गेले अशरफ गनी! मावत नसल्याने थोडा विमानतळावरच सोडून गेले
नवी दिल्ली,
अफगाणिस्तानचे अमेरिका समर्थक राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडताना रिकाम्या हाताने गेलेले नाहीत. ते आपल्यासोबत तब्बल 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भर कॅश घेऊन गेले आहेत. काबुल येथील रशियाच्या दूतावासाने सोमवारी हा धक्कादायक दावा केला आहे. रशियाची वृत्तसंस्थाने दूतावासातील सूत्रांचा दाखला देऊन हे वृत्त प्रसिद्ध केले. रोकड इतकी जास्त होती की हेलिकॉप्टर आणि कार कमी पडल्या. यानंतर काही कॅश गनी विमानतळावरच सोडून गेले.
तालिबानने सुद्धा आपल्याला विमानतळावर मोठ्या प्रमाणात रोकड मिळाल्याचा दावा केला होता. तालिबाननुसार ही रक्कम 5 दशलक्ष एवढी होती. पण, त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. आता रशियाच्या दूतावासाने याची पुष्टी केली.
अशरफ गनी आणि उपराष्ट्राध्यक्ष सालेह सुद्धा रविवारीच अफगाणिस्तान सोडून कझाखस्तानला गेल्याचे वृत्त होते. यामध्ये त्यांच्या जवळच्या अधिकारी आणि समर्थकांचा देखील समावेश होता. पण, ते नेमक्या कुठल्या विमानातून पसार झाले किंवा नेमके कुठे आहेत याचा पत्ता अद्याप कुणालाही नाही. काहींच्या मते, ते अमेरिकेला गेले आहेत. पण, ठोस माहिती कुणाकडेच नाही.
दरम्यान, गनी यांनी एक फेसबूक पोस्ट केली. त्यामध्ये अफगाणिस्तानात थांबले असता अधिक रक्तरंजित संघर्ष झाला असता. तोच टाळण्यासाठी आपण देश सोडल्याचे गनी म्हणाले आहेत. सोबतच, तालिबानने देशात शांतता बहाल करावी असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.
अफगाणिस्तानात रशियाचे जुने शत्रू असलेल्या तालिबानचे शासन प्रस्थापित होत आहे. तरीही आपण तेथील आपले दूतावास बंद करणार नाही अशी औपचारिक घोषणा रशियाने सोमवारी केली. उलट तालिबानसोबत संबंध प्रस्थापित करण्याचा रशिया प्रयत्न करणार आहे. तरीही तालिबानच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. त्यांच्या सरकारला मान्यता देण्याची सध्या घाई करणार नाही अशेही रशियाने स्पष्ट केले.
याच वेळी बोलताना काबुल येथील रशियन दूतावाचे प्रवक्ते निकिता आईशेंको म्हणाले की, गनी यांनी देश सोडला आहे. ते तब्बल 4 कार आणि 1 हेलिकॉप्टर भरून कॅश घेऊन गेले आहेत. देश सोडताना ते इतकी मोठी रक्कम घेऊन जात होते की ते कर आणि हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा मावत नव्हते. अशात त्यांनी काही कॅश काबुल विमानतळावर सोडला. माध्यमांशी बातचीत करताना सुद्धा आईशेंको यांनी आरोपांचा पुनरुच्चार केला. आपल्याकडे काही प्रत्यक्षदर्शी पुरावे सुद्धा आहेत असे त्यांनी सांगितले.
थोडा फार पैसा देशात आवश्य असेल
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे अफगाणिस्तान प्रकरणांशी संबंधित सल्लागार झामीर काबुलोव्ह यांनी देखील या मुद्द्यावर उपहास केला. आम्हाला माहिती नाही की अफगाणिस्तानात सध्या किती कॅश शिल्लक आहे. परंतु, गनी काही प्रमाणात पैसे आवश्य सोडून गेले असतील. कारण, सगळा कॅश तर घेऊन जाता येणार नाही असा चिमटा काबुलोव्ह यांनी घेतला.