भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात; महाराष्ट्रातील मंत्रीही सक्रिय

नवी दिल्ली,

आतापर्यंत केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामांना आणि विशेषत: कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून आजपासून देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारचे 39 मंत्री हे या जन आशीर्वाद यात्रेत देशभरातील 212 लोकसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेची सुरुवात केली आहे.

पालघरमधून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. केंद्र सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि राज्यातील महाविकास आघाडीचे अपयश लोकांना सांगणे हा उद्देश या यात्रेमागे असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, कोरोना काळात आम्ही कुठेही थांबलो नाही. मोदी सरकारने तळागाळातील लोकांसाठी काम केले, सर्वांसाठी मोफत लसीकरण सुरु केले. भारतात सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला असून याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. उज्ज्वला सारख्या योजना असतील किंवा इतर योजना असतील, यापासून कुणीही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्राला सर्वाधिक लसी केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत, पण तरीही महाविकास आघाडीकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जाते, असेही डॉ. भारती पवार म्हणाल्या. जन राजकीय दृष्टीने आशीर्वाद यात्रेला बघू नये, असेही त्या म्हणाल्या. राज्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील, डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांनीही आपापल्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरु केल्या आहेत.

भाजपची ही जन आशीर्वाद यात्रा 19,567 किमीहून अधिक लांबीची असणार असून ती 19 राज्यातून जाणार आहे. या दरम्यान 1663 लहान-मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूका असल्याने या जन आशीर्वाद यात्रेमध्ये त्या राज्यावर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे समजते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!