जम्मू पोलिसांनी उधळला दहशतवाद्यांचा कट; राममंदिर आणि पाणिपत रिफायनरी होती निशाण्यावर

श्रीनगर,

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी सुरक्षा दलांनी जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मोठा कट उधळून लावला आहे. यादरम्यान, पोलिसांनी चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी जैशशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दहशतवादी आयईडीचा वापर करून स्वातंत्र्यदिनी हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच त्यांच्या निशाण्यावर रामंदिर आणि पाणिपत रिफायनरीदेखील होती, असेही पोलिसांनी सांगितले.

रामंदिर आणि पाणिपत रिफायनरी निशाण्यावर –

जम्मू -काश्मीरमधील सुरक्षा दल दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवत आहेत. या अंतर्गत जम्मू पोलिसांनी जैशच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी ड्रोनमधून सोडलेली हत्यारे गोळा करून ते काश्मिर खोर्‍यातील जैशच्या दहशतवाद्यांकडे नेण्याचा प्रयत्न करत होते. तसेच 15 ऑगस्टपूर्वी आयईडी लावून वाहनावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या जैश दहशतवाद्यांपैकी एक जण यूपीच्या शामलीचा रहिवासी आहे. त्याला पाकिस्तानमधील जैश कमांडर मुनाझीरने अमृतसरजवळून ड्रोनद्वारे सोडण्यात येणारी शस्त्रे गोळा करण्यास सांगितले होते. तसेच पाणिपत येथील रिफायनरीचे व्हिडीओ काढून पाकिस्थानात पाठवण्याचेदेखील आदेश होते. त्याने रिफायनरीचे व्हिडीओ काढून पाकिस्थानात पाठवले. त्यासोबत राममंदिराचा व्हिडीओ देखील काढण्याचे त्याला सांगण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!