पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसर्‍या डोससाठी प्राधान्य द्या – पालकमंत्री अब्दुल सत्तार

धुळे,

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी आरोग्य विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. संभाव्य तिसर्‍या लाटेचे नियोजन करताना कोविड प्रतिबंधक लसीकरणात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसर्‍या डोससाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.

पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणू उपाययोजनांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे (निवडणूक), सुरेखा चव्हाण (भूसंपादन), गोविंद दाणेज (रोहयो), जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मात्र, तज्ज्ञांनी तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने दक्षता बाळगावी. कोविड प्रतिबंधात्क लसीकरणाला गती द्यावी. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑॅक्सिजन उपलब्धतेचे काटेकोरपणे नियोजन करावे. ते करतानाच ऑॅक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने कार्यान्वित होतील, अशी दक्षता घ्यावी. धुळे शहरासह जिल्ह्यात डेंग्यू तापाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. त्यासाठी कंटेनर सर्वेक्षणाचे नियोजन करावे. आवश्यक तेथे धुरळणी, फवारणी करावी.

जिल्ह्यात पावसाचा खंड पडला असून कृषी विभागाने जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून प्राथमिक अहवाल राज्य शासनाला पाठवून अवगत करावे. जमिनीच्या पोतानुसार पिकांचे नियोजन करण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी. तसेच ई- पीक पाहणी उपक्रमात जास्तीत जास्त शेतकर्‍यांना सहभागी करून घ्यावे, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. आमदार श्री. दराडे, आमदार श्रीमती गावित यांनी विविध सूचना केल्या.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या चार आहे. एकूण 45 हजार 847 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 45 हजार 123 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात 668 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दर 1.57 टक्के एवढा आहे, तर बरे होण्याचा दर 98.42 टक्के आहे. कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या कमी असली, तरी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून 66 लाख 53 हजार 950 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 11 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. ऑॅक्सिजन निर्मिती प्रकल्पांची संख्या 16 असून त्यांची क्षमता 12 टन आहे. पीएसए प्रकल्पांपैकी सहा कार्यरत असून 10 प्रस्तावित आहेत. ऑॅक्सिजन सिलिंडर 3,598 प्रस्तावित असून 3,568 उपलब्ध आहेत. याशिवाय एएसयू एकूण 3,622 प्रस्तावित असून त्यापैकी 3,577 उपलब्ध आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यात ऑॅक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध होईल.

महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेख यांनी डेंग्यू तापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थितीविषयी, तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

बोरकुंडला विकास कामांचे भूमिपूजन

जिल्हा परिषदेच्या बोरकुंड व रतनपुरा, ता. जि. धुळे गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते आज दुपारी झाले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले, जिल्ह्यातील पीक परिस्थितीची माहिती घेत असून याबाबत मुख्यमंत्री महोदयांना अवगत करण्यात येईल. यावेळी ग-ामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!