कोल्हापुरात ’हे’ खपवून घेणार नाही, भाजपच्या पदाधिकार्‍यांचा जिल्हाधिकार्‍यांना दम

कोल्हापूर,

कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि भाजप पदाधिकारी यांच्यात आज खडाजंगी झाली. सीपीआरमधील परिचारकांच्या बदल्यासह मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या भाजप पदाधिकार्‍यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनाच्या बाहेरच भाजपच्या पदाधिकार्‍यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकार्?यांना धारेवर धरले. मात्र निवेदन न घेताच जिल्हाधिकारी राहुल रेखावर हे कार्यालयात परतल्याने भाजपच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन भिंतीवर चिटकवत निषेध नोंदवला.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती गंभीर बनत असताना सीपीआरमधील परिचारकांची बदली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही बदली रद्द करावी. तसेच राज्य सरकारने आता सर्व व्यवसायांना व्यवसाय करण्यास दहा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. या धर्तीवर मंदिरे सुरू करावीत, अशी मागणी करत आज भाजपचे शिष्टमंडळ कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र निवेदन देत असताना केवळ पाच व्यक्तींंनी कार्यालयात यावे. अशी अट जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घातली. तसेच माध्यम प्रतिनिधींना मज्जाव केला. याचा भाजपच्या पदाधिकार्‍यांनी निषेध व्यक्त करत कार्यालयातूनच घोषणाबाजी सुरू केली. केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांना कोरोनाचे नियम आहेत का? इतर संघटनाचे पदाधिकारी 40 ते 50 येऊन कार्यालयात बसतात.

त्यावेळी तुम्हाला कोरोनाचे नियम आठवत नाहीत का? असा सवाल करत भाजपच्या पदाधिकार्‍यांनी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी सुरू केली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत जिल्हाधिकारी बाहेर येऊन निवेदन स्वीकारत नाहीत तोपर्यंत ही निदर्शने चालू राहणार असं भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सांगितलं. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी कार्यालयातून बाहेर येऊन निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दम देण्यास सुरुवात केली. कोल्हापुरात हे चालणार नाही. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी हे एका मंत्र्याच्या इशार्‍यावर काम करतात, असा आरोप देखील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केला. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दम भरत खडे बोल सुनावले. यावर जिल्हाधिकारी यांनी निवेदन न स्वीकारता पदाधिकार्‍यांना हात जोडून कार्यालयात जाणे पसंत केले. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या पदाधिकार्‍यांनी घोषणाबाजी सुरू केली. निवेदन न घेतल्याने भाजपच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाची प्रत थेट कार्यालयाच्या भिंतीवर चिटकवले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!