गडचिरोली जिल्हा विकासाच्या वाटेवर – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
गडचिरोली – दि.15 – गडचिरोली जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यात येत आहेत. दळणवळणाची कामे मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर असून गडचिरोली जिल्हा मुख्य प्रवाहात येत असून भविष्यात राज्यात इतर जिल्ह्याप्रमाणे गडचिरोली जिल्हा हा विकासात अग्रेसर असेल असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील मुख्य कार्यक्रमासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, ना.डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळयास जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपाडे तसेच यावेळी इतर पदाधिकारी व अधिकारी,कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री महोदयांनी जनतेला उद्देशून भाषण केले. नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांना राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्रध्दांजली अर्पण केली. राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित रहावी, तसेच एकीकृत मजबूत भारताच्या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांची आठवण काढणे सर्वांचे कर्तव्य आहे असे म्हणाले. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अभिमानाचे स्थान आहे. जिल्ह्यातील भाषा, भौगोलिक परिसर, निसर्ग जणू एक मिनी भारतच असल्याचे ते यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनीवरील ॲप व्दारा गा.न.नं.12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा “ई-पीक पाहणी” कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. आज होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभेत ई-पीक पाहणी प्रकल्पाची माहिती पालक, अधिकारी, तलाठी/कृषी सहाय्यक कर्मचाऱ्या मार्फत ग्राम सभेला देण्याबाबत संबंधित विभागाकडून निर्देश देण्यात आले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस व प्रशासनातील लोकांनी मेहनत करून संसर्गाला रोखण्यासाठी योगदान दिले आहे. जनतेने केलेल्या सहकार्यामुळे आज कोरोनाला रोखण्यात चांगले यश मिळत आहे. कोरोना काळात गरजू इमारत व बांधकाम कामगारांनाही मदतीचा हात देऊन शासनाने सहाय्य केले. यावेळी गडचिरोलीमधील 44608 कामगारांना 1 कोटी 87 लक्ष रूपये मदत देण्यात आली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी त्यांनी पोलीस दलातील राष्ट्रपती पदक तसेच शौर्य पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.