भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देशवासियांना शुभेच्छा
मुंबई, दि. 14 :- “कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्याचा, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांची जपणूक करण्याचा, देशाचा प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार पुढे घेऊन जाण्याचा, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतच चालत राहण्याचा आपण सर्वजण पुन्हा एकदा दृढनिश्चय करुया,” असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशवासियांना स्वातंत्र्याच्या 74व्या वर्धापनदिनानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. समस्त देशवासीय आज कोरोनापासून मुक्तीचा लढा मोठ्या निर्धारानं लढत आहेत. प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करुन आपणही कोरोनामुक्तीच्या लढ्याला बळ देऊया… महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया… असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीर शहिदांना श्रद्धांजली वाहिली असून देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांच्या त्याग, योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी हौतात्म्य पत्करलं. अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला. असंख्य कुटुंबांनी देशासाठी मोलाचं योगदान दिलं. कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, समर्पणातून आजचा महाराष्ट्र, आजचा भारतदेश घडला आहे. देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या भारतमातेच्या समस्त सुपुत्रांना मी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. कोट्यवधी स्वातंत्र्यवीरांचा त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखणं. भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं, त्यांना बळकट करणं हे आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्यं आहे. हे कर्तव्य पार पाडत असतानाच, देशाची प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारधारा पुढे नेणं, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतर चालत राहण्याचा निर्धार करुया…, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणतात की, भारतदेश भौगौलिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधतेने नटलेला, विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, लोककला, लोकसंस्कृती व इतिहासाचा गौरवशाली वारसा लाभलेला समृद्ध देश आहे. देशाची विविधता हीच देशाची शक्ती आहे. सर्व जात, धर्म. भाषा, पंथ, प्रांतांना सोबत घेऊन सशक्त, समर्थ, समृद्ध, बलशाली भारत आपल्या घडवायचा आहे. महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्षाची सांगता होत असतानाचा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण पदार्पण करत आहोत. हा निश्चितच चांगला योग आहे. आपल्या देशानं गेल्या 75 वर्षांच्या वाटचालीत यशाची अनेक शिखरं सर केली. देशाच्या अनेक सुपुत्रांनी कृषी, उद्योग, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात जागतिक दर्जाचं यश मिळवलं. देशाचा गौरव वाढवला. चांद्रयान, मंगळयानासारख्या मोहिमा राबवल्या. नुकत्याच संपलेल्या टोकीयो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकासह सात पदकं जिंकून आपल्या खेळाडूंनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित केला. ऑलिंपिक पदकांची सप्तपदी पूर्ण करणाऱ्या ऑलिंपिकविजेत्या खेळाडूंचं, तसंच त्यांच्या यशात योगदान देणाऱ्या प्रशिक्षक, मार्गदर्शक, सहकारी, हिचतिंचक, चाहत्यांचंही उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्तानं अभिनंदन केलं आहे.
आपला देश दीड वर्षापासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनाशी लढताना नागरिकांचा जीव वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. आर्थिक आव्हानांचा सामना करताना राज्यातील विकासप्रक्रिया थांबणार नाही, पायाभूत प्रकल्प सुरु राहतील, सामाजिक न्यायाच्या योजनांना संपूर्ण निधी मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील, देशातील नागरिकांनी प्रतिबंधक उपाययोजनांचं पालन करुन चांगलं सहकार्य केलं. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, अंगणवाडीताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय संस्थांचे, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी या सर्व कोरोनायोद्ध्यांनी पहिल्या फळीत, आघाडीवर नागरिकांचा जीव वाचवला. नागरिकांचा जीव वाचवताना अनेक कोरोनायोद्ध्यांना प्राण गमवावे लागले. या दिवंगत कोरोनायोध्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. देश कोरोनायोद्ध्यांच्या त्याग सदैव स्मरणात ठेवेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी कोरोनायोद्ध्यांच्या कार्याचं स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त केली.
महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य आहे. कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सहकार अशा अनेक क्षेत्रात अव्वल असलेल्या महाराष्ट्रानं नागरिकांच्या जीवरक्षणाला नेहमी सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. कोरोना संकटकाळात आर्थिक नुकसान सहन करुन सरकानं नागरिकांचे जीव वाचवण्यास प्राधान्य दिलं. यापुढेही नागरिकांचा जीव वाचवणं, त्यांना संकटातून बाहेर काढणं हीच सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे. देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत असतानाच, राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी, महापूर व दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बंधू-भगिनींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृत्यू पावलेल्या बांधवांच्या कुटुंबियांना व इतर आपत्तीग्रस्तांना वित्तहानीच्या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी, जीवनात पुन्हा उभं समर्थपणे करण्यासाठी राज्य शासनानं तब्बल 11 हजार 500 कोटींचा निधी मंजूर केला आहे. केंद्राच्या प्रचलित दरांपेक्षा अधिकची मदत आपत्तीग्रस्तांना देण्यात येत आहे. राज्य सरकारने आपत्तीग्रस्तांसाठी मंजूर केलेल्या 11 हजार 500 कोटी रुपयांपैकी दीड हजार कोटी रुपये आर्थिक मदतीच्या स्वरुपात देण्यात येणार आहे. तीन हजार कोटी रुपये पुनर्बांधणीच्या कामांसाठी उपयोगात आणले जातील. उर्वरीत सात हजार कोटी रुपये प्रतिबंधात्मक उपाययोजना, आपत्ती सौम्यीकरणाच्या कामासाठी वापरले जाणार आहेत. या साडेअकरा कोटींच्या निधीतून राज्यातील आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींना दिलासा, आधार, विश्वास देण्याचं काम राज्य सरकारनं केलं आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. देशावरील प्रत्येक संकटावेळी महाराष्ट्र मदतीसाठी, संरक्षणासाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. इतिहासाची ही गौरवशाली परंपरा महाराष्ट्र कायम राखेल, हा विश्वास देतो. महाराष्ट्र आणि देश आज कोरोना संकटाशी लढत आहे. 75 वर्षांपूर्वी आपण देशाच्या स्वातंत्र्याचा लढा निर्धाराने लढलो. सद्यस्थितीत कोरोनामुक्तीचा, कोरोनापासून स्वातंत्र्याचा लढा त्याच निर्धाराने लढायचा आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी टाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे आदी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आपण कोरोनामुक्तीचा लढा निश्चितपणे जिंकू शकू, असा विश्वास करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना कोरोनामुक्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.