गर्भाशयात नव्हे तर उदर पोकळीत विकसित झालं बाळ; दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये विचित्र डिलिव्हरी यशस्वी
नवी दिल्ली,
दिल्लीच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी एक विचित्र डिलिव्हरी यशस्वी करुन दाखवली आहे. या नवजात बाळाचा विकास हा गर्भाशयात झाला नसून उदर पोकळी म्हणजे अॅबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये झाला आहे. साधारण प्रेग्नन्सीमध्ये फर्टिलाईज्ड एग हे युटेरस म्हणजे गर्भाशयात विकसित होत असते. पण या केसमध्ये विचित्र प्रकार घडला असून बाळाचा विकास हा आईच्या उदर पोकळीत झाल्याचं दिसून आलं आहे. ही घटना अतिशय दुर्लभ अशीच आहे.
ज्यावेळी फर्टिलाईज्ड एग हे अॅबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये म्हणजे उदर पोकळीत विकसित होत असतं त्यावेळी तो गर्भ जास्तीत जास्त चार किंवा पाच महिन्यांपर्यंत वाढतो. नंतर तो मृत होतो. पण या प्रकरणातील बाळाची वाढ ही अॅबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये पूर्ण झाली आणि सोमवारी सकाळी सीजेरियनच्या माध्यमातून ही डिलिव्हरी करण्यात आली. सध्या या बाळाचे वजन हे 2.65 किलो असून ते सुखरुप असल्याची माहिती आरोग्य हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि स्त्री रोग तज्ज्ञ अंजली चौधरी यांनी दिली.
डॉ. अंजली चौधरी यांनी सांगितलं की, ‘या प्रकरणामध्ये संबंधित महिलेने आधी केलेल्या अल्ट्रासाऊंड स्कॅनिंगमधून याची काहीच माहिती समोर आली नव्हती. सातवा महिना सुरु असताना ही महिला आरोग्य हॉस्पिटलमध्ये आली आणि विविध तपासण्या केल्यानंतर आम्हाला या गोष्टीची माहिती मिळाली. या विचित्र परिस्थितीमुळे गर्भाशयाच्या डाव्या बाजूवर जास्त दबाब पडत होता. त्यामुळे आम्हाला गर्भाशयात एक नवीन स्टेंट टाकावी लागली.‘
अॅबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये या बाळाची वाढ उलटी होत असल्याचं लक्षात आलं. म्हणजे या बाळाचे डोकं हे योनीमार्गाकडे पूश होत नसून त्याचे पाय पूश होत असल्याचं दिसून आलं. परिणामी डिलिव्हरी प्रचंड कॉम्प्लिकेटेड बनल्याने डॉक्टरांनी सी-सेक्शन डिलिव्हरीचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी केला. जन्मानंतर या बाळाला 12 तास आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता या बाळाला त्याच्या आईकडे सोपवण्यात आलं असून आई आणि नवजात बालकाची तब्येत उत्तम आहे.