‘ऑपरेशन लंगडा’ अंतर्गत उत्तर प्रदेशात 8,472 एन्काउंटर्स तर 3302 कथित गुन्हेगारांना घातल्या गोळ्या

लखनौ,

जेव्हापासून उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आली तेव्हापासून आतापर्यंत यूपी पोलिसांनी 8472 चकमकींमध्ये 3302 कथित गुन्हेगारांना गोळ्या घातल्या आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना पायांवर गोळ्या लागल्या. या चकमकींतील मृतांची संख्या 146 आहे. किती जण या चकमकींमध्ये पायाला गोळ्या लागल्याने अपंग झाले, याची आकडेवारी पोलिसांनी ठेवलेली नाही. 13 पोलीस कर्मचार्‍यांचा देखील या सर्व चकमकींमध्ये मृत्यू झाला. तर, तब्बल 1157 पोलीस जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या सर्व चकमकींमध्ये 18225 गुन्हेगारांना अटक झाली आहे. अधिकृतरित्या नाही, पण अनेक पोलीस अधिकारी या चकमकींना ‘ऑपरेशन लंगडा’ म्हणतात.

यूपी पोलीस एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार याबाबत द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, पोलीस चकमकींमध्ये जखमी झालेल्यांची संख्या मोठी आहे. याचाच अर्थ गुन्हेगारांना मारणे हा पोलिसांचा हेतू नव्हता, तर त्यांना अटक करणे हा होता. गुन्हे आणि गुन्हेगारांबाबत ‘झिरो टॉलरन्स’ उत्तर प्रदेश सरकारचे धोरण आहे. कर्तव्यावर असताना जर कोणी आमच्यावर गोळीबार केला, तर आम्ही प्रत्युत्तर देतो. कायद्याने हा अधिकार पोलिसांना दिला आहे. अशावेळी दोन्ही बाजूची लोक जखमी होऊ शकतात किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो. आमचे अनेक लोक मारले गेले आणि जखमीही झाले. मुख्य म्हणजे काही बेकायदेशीर घडले तरच पोलीस गोळीबार करतात. अशावेळी आमचा हेतू हा गुन्हेगारांना अटक करणे हा असतो मारणं नाही.

एखाद्या चकमकीत कोणाचा मृत्यू झाल्यास काय करावे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित एक निश्चित प्रक्रिया आहे. त्याशिवाय, प्रत्येक चकमक ही दंडाधिकारी चौकशीतून जाते. न्यायालयात पीडितांना त्यांची बाजू मांडण्याचा सर्व अधिकार आहे. पण, आजपर्यंत कोणत्याही न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या चकमकींच्या विरोधात काहीही म्हटले नाही. सर्वोच्च न्यायालयाने चकमकीत होणार्‍या हत्यांबद्दल गंभीर विचार करणे आवश्यक असल्याचे जानेवारी 2019 मध्ये म्हटले होते. राज्यातील विरोधी पक्षांनीही अनेकदा या हत्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. पण, गुन्हेगारांना मारून टाका, असे राज्य सरकारचे धोरण असल्याचे कुमार सांगतात.

पुढच्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील अनेक अधिकारी या चकमकींना अचिव्हमेंट समजत आहेत. अनेकदा स्वत: मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांनी गुन्हेगारी सोडली नाही आणि सुधारले नाहीत तर त्यांचे मुडदे पाडण्यास पोलीस मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ झोनमध्ये सर्वात जास्त 2839 चकमकी झाल्या आहेत. त्यामध्ये 5288 जणांना अटक करण्यात आली तर 61 जणांचा मृत्यू झाला. आणि 1547 जण जखमी झाले. त्यानंतर आग्र्यामध्ये 1884 चकमकीत 4878 जणांना अटक करण्यात आली. तर, 18 जणांचा मृत्यू आणि 218 जण जखमी झाले.

मेरठमध्येच पोलीस जखमी होण्याचे प्रमाणही सर्वात जास्त आहे. मेरठमध्ये 435 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर, बरेलीत 224 आणि गोरखपूरमध्ये 104 जण जखमी झाले. तर, कानपूर झोनमध्ये सर्वाधिक पोलिसांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. कुख्यात गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान बिक्रू गावात झालेल्या चकमकीत आठ पोलीस मारले गेले होते. दुबेने नंतर मध्यप्रदेशात आत्मसमर्पण केले आणि उत्तर प्रदेशात परत आणत असताना झालेल्या दुसर्‍या पोलीस चकमकीत तो मारला गेला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!