स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, इंडिया टुरिझम आणि उबर कॅब सेवेचा संयुक्त उपक्रम
उबरच्या प्रवासी कॅबवर, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उपक्रमांची जाहिरात
मुंबई, 14 ऑगस्ट 2021
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाविषयी लोकांना माहिती देण्याच्या दृष्टीने, पर्यटन मंत्रालयाच्या मुंबईतील ‘इंडिया टुरिझम’ या क्षेत्रीय कार्यालयाने (पश्चिम आणि मध्य भारत), मुंबईतील प्रवासी टॅक्सी, उबर कॅबवर, या अभियानाची जाहिरात करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक व्यंकटेशन दत्तात्रेयन यांच्या हस्ते या महिनाभर चालणाऱ्या विशेष मोहिमेचे उद्घाटन झाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या अभियानाची मुख्य संकल्पना, ‘प्रत्येक भारतीयाचे आयुष्य साजरे करणे’ आणि ‘स्वातंत्र्यलढ्याचा मागोवा’ अशी आहे. 130 कोटी भारतीय लोक जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा 75 वर्षांचा दीर्घ प्रवास साजरा करत असल्याचा संदेश देणे, हा उद्देश या महोत्सवाची जाहिरात करण्यामागे आहे.
‘स्वातंत्र्यलढ्याचा मागोवा’ या उपक्रमामुळे लोकांना देशाच्या स्वातंत्र्यलढयाशी संबंधित विविध ऐतिहासिक ठिकाणांचा शोध आणि माहिती घेण्याची प्रेरणा मिळते.
उपक्रमाच्या पहिल्या टप्पात मुंबई विमानतळाबाहेरुन प्रवासी घेणाऱ्या 27 गाड्यांवर ही जाहिरात करण्यात आली आहे. या कॅब मुंबईच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांपर्यंत या अभियानाची माहिती पोचवतील.