विराटला आजवर कधी जमलं नाही ते रोहित शर्मानं पहिल्या इनिंगमध्ये करून दाखवलं
लॉर्ड,
नॉटिंघममध्ये जी गोष्ट जमली नाही ती रोहित शर्मानं ऐतिहासिक लॉर्ड मैदानावर केली आहे. रोहितनं लॉर्ड टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. रोहितनं फक्त 83 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे इंग्लंडमधील टेस्ट मॅचमध्ये हे पहिलेच अर्धशतक आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये रोहित 107 बॉलमध्ये 36 रन काढून आऊट झाला होता.
लॉर्डच्या ऐतिहासिक मैदानात टीम इंडियाच्या दिग्गज बॅटसमनची कामगिरी खराब झाली आहे. 27 टेस्ट शतक झळकावणारा विराट कोहली लॉर्डवर आजवर फ्लॉप ठरला आहे. विराटचा लॉर्डवरील सर्वोच्च स्कोर फक्त 25 आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माची लॉर्डवर ही पहिलीच टेस्ट मॅच आहे. पहिल्याच टेस्टमध्ये रोहितनं या मैदानात कशी बॅटींग करायची हे दाखवून दिलं आहे.
रोहितनं नॉटिंघमप्रमाणे लॉर्डवरही सावध सुरुवात केली. अँडरसन आणि ओली रॉबिन्सन यांच्या स्विंग बॉलचा त्यानं आदर केला. ऑॅफ स्टंपच्या बाहेर जाणारे बॉल त्याने सोडले. तर खराब बॉलचा समाचार घेतला. विशेषत: सॅम करनला रोहितनं लक्ष्य केलं. रोहितनं करनच्या एकाच ओव्हरमध्ये चार फोर लगावले. त्यानंतर इंग्लंडमधील पहिले आणि टेस्ट कारकिर्दीमधील 13 वे अर्धशतक पूर्ण केले.
रोहितनं सलग दुसर्या टेस्टमध्ये केएल राहुलसोबत चांगली ओपनिंग पार्टनरशिप केली आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये 97 रनची पार्टनरशिप करणार्या या जोडीनं लॉर्डसमध्ये शतकी पार्टनरशिप केली आहे. 1952 नंतर पहिल्यांदाच लॉर्ड टेस्टमध्ये ओपनिंग जोडीनं 50 पेक्षा जास्त रनची पार्टनरशिप केली आहे.