शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उड्डाणपुलावरील खड्डे व बंद पथदिवे देत आहेत अपघातास आमंत्रण
धरणगाव प्रतिनिधी – हर्षल चौहान.
शहरातील आई सावित्रीबाई फुले उड्डाण पुलावर खड्डे पडले असल्याने याठिकाणी अनेक वेळा अपघात होत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने शहरातील मुख्य रस्ता असलेल्या या उड्डाणपुलावर मोठ्या अडचणी प्रवासी व नागरिकांसाठी निर्माण झाल्या आहेत. हे खड्डे व बंद पथदिवे अपघातास आमंत्रण देत असल्याचे चित्र याठिकाणी निर्माण झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी खड्डे पाडले असून काही दिवसांपासून पथदिवे देखील बंद स्थितीत आहेत. आज यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते विशाल महाजन यांनी सांगितले कि, याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता असून नुकताच एक अपघात होतांना एक मोटार सायकल स्वार थोडक्यात बचावला आहे.
रात्री या रस्त्यावरून शहरातील नागरिक फिरण्यासाठी जात असतात. तसेच हा शहरातील मुख्य रस्ता आहे. याठिकाणी अंधाराचा फायदा घेत काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाने त्वरित दखल घेवून या ठिकाणची पथदिवे त्वरित दुरूस्त करून सुरु करावीत तसेच रस्त्यावर पडलेली खड्डे देखील त्वरीत बुजविण्यात यावीत अशी मागणी प्रवासी व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.