न्यूझीलंडच्या केर्न्सची प्रकृती चिंताजनक

कॅनबेरा,

न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला कॅनबेरा (ऑॅस्ट्रेलिया) येथील एका रुग्णालयामध्ये लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. केर्न्स हा घसरून पडल्याने जखमी झाल्याचे वृत्त ऑॅस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

51 वर्षीय ख्रिसवर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया झाल्या असून त्याची प्रकृती मागील काही काळापासून चिंतेचा विषय राहिली आहे. ख्रिसला हृदयासंदर्भातील आरोग्य समस्या असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र शस्त्रक्रियांना त्याच्या शरीराने म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने दिवसोंदिवस त्याची प्रकृती खालावत आहे. ख्रिसच्या हृदयातील मुख्य धमणीला इजा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या अशा समस्येला वैद्यकीय भाषेमध्ये अ‍ॅरोटीक डायसेक्शन असं म्हणतात. ख्रिसच्या प्रकृतीसंदर्भात न्यूझीलंडमधील खेळाडूंच्या संघटनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ख्रिसने न्यूझीलंडकडून 62 कसोटी आणि 215 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच तो देशासाठी दोन टी-20 सामनेही खेळला आहे. 1989 ते 2006 दरम्यान त्याने न्यूझीलंडकडून अष्टपैलू खेळाडू म्हणून समाधानकारक कामगिरी केली. नंतर तो समालोचक म्हणून काम करायचा. आपल्या कालावधीमध्ये ख्रिस हा सर्वोच्च अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. विशेष म्हणजे त्याचे वडील लान्स हे सुद्धा न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळले आहेत.

2008 साली भारतात खेळवण्यात आलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये चंडिगड लायन्स संघाकडून खेळताना मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले. मात्र त्याने हे सर्व आरोप फेटाळले. त्याने यासंदर्भात कायदेशीर लढाईही लढली आहे. त्यानंतर केर्न्स 2014 रोजी चर्चेत आला होता. उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्याला बस डेपोची साफसफाईचे काम करावे लागत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मॅच फिक्सिंगच्या आरोपांवरुन बि-टिश अधिकार्‍यांनी चौकशी सुरू केल्यानंतर ख्रिसच्या मागे न्यायालयीन चौकशी ससेमिरा सुरु झाला. न्यायालयीन लढाईचा खर्च, गोठवलेली बँक खाती यामुळे दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठीही ख्रिसला साफसफाई कामगार म्हणून काम करावं लागलं. तो ऑॅकलंड कौन्सिलमध्ये बस डेपोच्या साफसफाईचे काम करायच्या ज्यासाठी त्याला ताशी 17 डॉलर पगार मिळत असे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!