पाचव्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 157 धावांची आवश्यकता
नॉटिंगघम
8 ऑगस्ट
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील आजचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. भारताला पाचव्या दिवशी विजयासाठी फक्त 157 धावांची गरज आहे. तर इंग्लंडला विजयी सुरुवात करण्यासाठी 9 विकेटसची आवश्यकता आहे. भारताच्या जिंकण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 209 धावांचे आव्हान दिले होते. यापैकी भारताने चौथ्या दिवसाखेर 14 ओव्हरमध्ये 1 बाद 52 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता भारताला फक्त 157 धावांची आवश्यकता आहे.
विजयी धावांचं पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची दिलासादायक सुरुवात झाली. केएल राहुल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने 34 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर राहुल 26 धावा करुन बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. त्याने रोहितला चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चांगली साथ दिली. त्यामुळे हीच जोडी आता पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करणार आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित आणि पुजारा हे दोघेही 12 धावांवर नाबाद होते. या दोघांकडून टीम इंडियाच्या चाहत्यांना चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया हा सामना जिंकत 5 सामान्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेणार की इंग्लंड बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.