पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा 9 वा हप्ता जारी

पंतप्रधानांनी साधला महाराष्ट्र आणि गोवातील लाभार्थ्यांशी संवाद

मुंबई-पणजी, 9 ऑगस्ट 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता आज जारी करण्यात आला. सुमारे 9.75  कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांना या योजनेद्वारे 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आज थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जारी करण्यात आली. पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत एक लाख 60 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी आज पीएम-किसान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. संवादासाठी गोव्यातून महिला लाभार्थी श्रीमती प्रतिभा वेळीप सहभागी झाल्या होत्या. पंतप्रधानांशी संवाद साधताना प्रतिभा वेळीप यांनी सांगितले की, त्या काजू, नारळ, केळी अशी मिश्र शेती करतात. भातलागवडीसाठी त्यांनी ‘श्री’ पद्धतीचा अवलंब केला आहे. या पद्धतीमुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान मोदी यांनी प्रतिभा वेळीप यांना पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेचा काही लाभ होतो का, असे विचारले. त्यावर पीएम-किसान योजनेतून मिळालेल्या रक्कमेतून खते, बी-बियाणे आणि कीटकनाशकांची खरेदी केली आहे. पीएम-किसान योजनेचा कुटुंबाला चांगला लाभ झाल्याचं प्रतिभा वेळीप म्हणाल्या.

पंतप्रधानांनी यानंतर रत्नागिरी येथील आंबा उत्पादक शेतकरी देवेंद्र झापडेकर यांच्याशी संवाद साधला. देवेंद्र झापडेकर यांनी कृषी पायाभूत सुविधा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतले आहे. यातून त्यांनी आंबा पिकवणी केंद्र उभारले आहे. यामुळे अगदी 4-5 दिवसांत नैसर्गिकरीत्या आंबा पिकवता आला. पूर्वी पारंपरिक पद्धतीने आंबे पिकवल्यामुळे 20-30 टक्के फळांचे नुकसान होत होते. मात्र, पिकवण केंद्रामुळे (Ripening Chamber) पिकांचे नुकसान होत नाही, तसेच वेळेची बचत झाल्याचे देवेंद्र यांनी सांगितले.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शेती व्यवसायाकडे वळलेल्या देवेंद्र यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. पीएम-किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षभरात 2,000 रुपयाचे तीन हप्ते असे एकूण 6,000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण योजनेतून जमा केले जातात.  

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!