मुस्तफिजुर रहमानचे ते षटक वर्षांवर्षे आठवणीत राहिल; 6 चेंडूत इतिहास बदलला
ढाका
7 ऑॅगस्ट
यजमान बांगलादेश क्रिकेट संघाने शुक्रवारी असा कमाल दाखवला की, त्यांची नोंद बांगलादेश क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षराने करण्यात आली. ढाकाच्या शेरे बांगला स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या टी-20 मालिकेतील तिसर्या सामन्यात बांगलादेशने ऑॅस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव केला. बांगलादेशचा हा ऑॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह बांगलादेशने पाच सामन्याच्या मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेतली. बांगलादेशने आपल्या क्रिकेट इतिहासात कोणत्याही क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये पहिल्यांदा ऑॅस्ट्रेलिया संघाचा पराभव केला आहे. तिसर्या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार महमुदुल्लाह याला देण्यात आला. पण या सामन्यात बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याने गोलंदाजीत कमाल करत सामना फिरवला.
तिसर्या टी-20 सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा डाव गडगडला. तेव्हा कर्णधार महमुदुल्लाह याने मोर्चा सांभाळत 55 चेंडूत 52 धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर बांगलादेशला कशीबशी 127 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑॅस्ट्रेलियाकडून पदार्पणाचा सामना खेळत असलेला नॅथन एलिस याने डावाच्या अखेरच्या तीन चेंडूवर तीन गडी बाद करत हॅट्टि्र्क घेतली. ऑॅस्ट्रेलियाला 128 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले.
ऑॅस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. पण त्यांना सुरूवातीला धक्के बसले. तेव्हा सलीमीवीर बेन मॅकडरमॉट आणि मिचेल मार्श या जोडीने किल्ला लढवला. मार्शने 47 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर मॅकडरमॉटने 35 धावा जोडल्या. या दोघांच्या भागिदारीच्या जोरावर ऑॅस्ट्रेलिया हळूहळू विजयाजवळ पोहोचत होता. 18 व्या षटकानंतर ऑॅस्ट्रेलियाला विजयासाठी 23 धावांची गरज होती. ऑॅस्ट्रेलियाचे 6 गडी शिल्लक होते.
19वे षटक फेकण्यासाठी मुस्तफिजुर रहमान आला. त्याच्यासमोर डॅम ख्रिश्चियन आणि अॅलेक्स कॅरी ही जोडी फलंदाजी करत होते. त्याने पहिल्या चेंडू ऑॅफ स्टम्पवर फेकला. यावर फलंदाज कॅरीने स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला. पण यावर धाव निघाली नाही. दुसर्या चेंडूवर कॅरीने डीप कवरला चेंडू ढकलत एक धाव घेतली. तिसर्या चेंडूवर निर्धाव गेला. चौथा चेंडू मुस्तफिजुरने कटर टाकला. यावर देखील ख्रिश्चियनला धाव काढता आली नाही. पाचव्या चेंडूवर पुढे येऊन ख्रिश्चियन चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केला. पण यावर देखील धाव निघाली नाही. सहावा चेंडू परफेक्ट यॉर्कर होता. यावर देखील धाव निघाली नाही. या षटकात मुस्तफिजुरने फक्त एक धाव दिली. या षटकानंतर सामना बांगलादेशकडे झुकला. अखेरीस मेहदी हसनने फेकलेल्या 20व्या षटकात 11 धावा निघाल्या आणि बांगलादेश 10 धावांनी विजयी झाला.