बालकांसाठी मातृत्व दुग्ध पेढी वरदान – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर प्रतिनिधी
दि. 7 : आईचे दूध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असले तरी काही मातांना विविध कारणांमुळे स्तनपान देणे शक्य होत नाही. अशा बालकांसाठी ‘मातृत्व दुग्ध पेढी’ (ह्युमन मिल्क बँक) वरदान असल्याचे मत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज व्यक्त केले.
स्तनपान सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालयातील ‘मातृत्व दुग्ध पेढीचे’ उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार विकास कुंभारे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षीका डॉ. सीमा पारवेकर, डॉ. विनीता जैन, डॉ. माधुरी थोरात, प्रशासकीय अधिकारी प्रशांत पाटील, डॉ. संध्या डांगे आदी उपस्थित होते.
आईच्या दुधापासून काही नवजात अर्भक काही कारणाने वंचित राहतात. अनाथालये आईच्या दुधाची तहान दुधाचे पावडर, बाटली किंवा बालान्नाने (बेबी फूड) भागवितात. यामुळे अशा मुलांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक वाढ मंदावते. यावर उपाय म्हणून ह्युमन मिल्क बँकची मागणी अनाथालयांकडून होत आली आहे. याशिवाय काही मातांना बाळाला जन्म दिल्यानंतरही दूध येत नाही. यासाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ मदतीचे ठरते.
यावेळी डॉ. विनीता जैन यांनी मिल्क बॅंकविषयीचे विस्तृत सादरीकरण केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षीका डॉ. सीमा पारवेकर यांनी रुग्णालयात राबविण्यात येणाऱ्या जननी सुरक्षा योजना कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियानाची माहिती पालकमंत्र्यांना दिली. डागा रूग्णालय हे 500 खाटाचे शहरातील एकमेव शासकीय महिला व बाल रूग्णालय आहे. येथे बाह्य रूग्ण विभागात दिवसाकाठी 700 ते 800 रूग्णांची नोंद होत असल्याचे सांगितले. तसेच वर्षाकाठी तेरा हजारच्या जवळपास प्रसूती इथे होत असल्याची माहिती दिली. स्तनपान सप्ताहानिमित्त रूग्णालयात रांगोळी स्पर्धा व गरोदर माता व बालकांचा आहार कसा असावा याविषयी माहिती देणाऱ्या स्टॉलची पाहणी पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केली. दूधापासून पोरकी झालेली नवजात मुले, दूध न येणे, याशिवाय आईला क्षयरोगाची बाधा असणे, कावीळ, एड्स, इतर मानसिक आजारांची लागण होणे, झोपेची औषधे, कॅन्सरवरील औषधे, सल्फा, टेट्रासायक्लीन, इस्ट्रोज ही औषधे चालू असणे व स्तनात गळू झाल्यास आदी कारणांमुळे आईच्या दुधापासून बालके वंचित राहतात. डागा रूग्णालयातील प्रसुतींचे प्रमाण अधिक असल्याने मातेच्या दूधापासून वंचित बालकांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’चा पर्याय आहे.