10 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न

जालना प्रतिनिधी

6 ऑगस्ट

ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या आहेत, विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत.  येणार्‍या काळामध्ये प्रत्येक गावाचा टप्प्या-टप्प्याने विकास करुन गावे समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

अंबड तालुक्यातील करंजळा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन 1 कोटी रुपये खर्चुन करण्यात येणार्‍या करंजळा ते जालुरा या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उदघाटन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी उपस्थित गावकर्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी निसार देशमुख, सतीषराव होंडे, डॉ. गणेश पवार, रईस बागवान, परमेश्वर काळबांडे, शिवाजी म्हस्के, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसिलदार श्री कडवकर, कृषि विकास अधिकारी श्री गिरी, विनोद ठाकरे, शिवाजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोना महामारीमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी हा आरोग्य सेवा पुरविण्यावर खर्च करण्यात येत आहे.  त्यामुळे इतर विकास कामांची गती कमी झाली असली तरी येणार्‍या काळामध्ये प्रत्येक गावांमध्ये विकासाची कामे करण्यासाठी अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करुन घेऊन टप्प्या-टप्प्याने प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

घनसावंगी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस पीकाची लागवड करण्यात येते.  ऊसपीकाची शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी देशात नावाजलेली वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची उपशाखा समर्थ सहकारी साखर कारखाना येथे कार्यान्वित करण्यात आली आहे असुन यासाठी 128 एकर जागाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.    या इन्स्टीट्युटच्या माध्यमातुन ऊसाच्या वेगवेगळया वाणांची निर्मिती करण्याबरोबरच या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्सही उपलब्ध करुन देण्यात आले असल्याने येणार्‍या काळात ही इन्स्टीट्युट शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

बदलत्या काळानुसार ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या पाल्यांनी आता केवळ शेतीपुरतेच मर्यादित न राहता शासकीय नोकर्‍यांसह ईतर क्षेत्रामध्ये झेप घेण्याची गरज असल्याचे सांगत गावांमध्ये सभामंडपाबरोबरच शिक्षण खोल्यांची निर्मितीही होणे गरजेचे असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांच्या हस्ते पैठण-शहागड-गोंदी-तिर्थपुरी-घनसांवगी रामा-26 या 5 कोटी 25 लक्ष रुपये, राममा-211 ते भगवाननगर या 1 कोटी 42 लक्ष रुपये वडीगोद्री-रामा-223 ते घुं.हादगांव या 2 कोटी 19 लक्ष रुपये तसेच वडीगोद्री गावातील विविध कामांचा शुभारंभही करण्यात आला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!