राज ठाकरेंच्या रक्तातच हिंदुत्त्व, मनसे-भाजप युती झाल्यास आनंदच – बाळा नांदगावकर
मुंबई प्रतिनिधी
5 ऑगस्ट
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (6 ऑॅगस्ट) कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल, असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा भाजप-मनसे युती करणार या चर्चांना बळ मिळाले आहे.
’राजकारणात काहीही होऊ शकते’
’चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांच्या भेटीला आले होती. ही सदिच्छा भेट होती. यापूर्वी नाशिकमध्ये त्यांची भेट झाली होती. परप्रांतीय यांच्या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चंद्रकांत पाटलांना क्लिप पाठवली होती. पाटलांनी 3-4 वेळा ती क्लिप पाहिली. राजकारणात काहीही होऊ शकते’, असे नांदगावकरांनी म्हटले.
पाटलांनी नांदगावकरांच्या कानात काय सांगितलं?
’चंद्रकांत पाटील जाताना माझ्या कानात काही बोलले, ते सकारात्मक होतं. राजकारणात काहीही होऊ शकतं. सकारात्मक विचार केला पाहिजे. राजकारणात जर तरला महत्व नसतं. काहीही होऊ शकतं. जवळपास 50 मिनिटांची पाटील-ठाकरे यांच्यात चर्चा झाली. मात्र, कानात काय म्हणाले ते मी सांगू शकत नाही’, असेही नांदगावकर म्हणाले.
’ठाकरेंच्या रक्तात हिंदुत्त्व’
’आम्ही एकटे लढलो तरी सकारात्मक आहोत. पुढे देखील सकारात्मक असणार आहोत. राज ठाकरे यांच्या रक्तात हिंदुत्व आहे’, असे नांदगावकर यांनी सांगितले.
भाजप-मनसेची युती शिवसेनेला जड जाणार?
चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप-मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच नांदगावकरांच्या वक्तव्यावरून या चर्चांना आणखी बळ मिळत आहे. त्यामुळे पुढील काळात दोन्ही पक्ष एकत्र आल्यास शिवसेनेला जड जाऊ शकतं, अशी चर्चा आतापासूनच होऊ लागली आहे.