स्वर्णिम विजय वर्ष विजय ज्योत नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर नेण्यात आली
प्रतिनिधी-
ठळक वैशिष्ट्ये :
1971 च्या युद्ध वीरांना श्रद्धांजली म्हणून भारतीय नौदलाकडून विजय ज्योतीला समारंभपूर्वक मानवंदना
आयएनएस खुकरीच्या अधिकारी आणि नौसैनिकांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली
नेताजींनी तिरंगा फडकवल्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी रॉस बेटाचे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे नामकरण केले होते.
04 ऑगस्ट 2021 रोजी अंदमान आणि निकोबार कमांडच्या नौदल विभागाच्या नेतृत्वाखाली स्वर्णिम विजय वर्ष विजय ज्योत नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर, अर्थात पूर्वीच्या रॉस बेटांवर नेण्यात आली . आणि ‘लोन सेलर स्टॅच्यू’ येथे 1971 च्या युद्धात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून भारतीय नौदल रक्षकांनी पुष्पचक्र अर्पण करून समारंभपूर्वक मानवंदना दिली.
ज्यांनी सागरी मोहिमांमध्ये शौर्य दाखवले आणि सर्वोच्च बलिदान दिले त्यांच्या सन्मानार्थ पोर्ट ब्लेअर हार्बरकडे जाणाऱ्या मार्गावर ‘लोन सेलर स्टॅच्यू’ बांधण्यात आला आहे. 1971 च्या युद्धाच्या संदर्भात, कमांडिंग ऑफिसर कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला (महावीर चक्र मरणोत्तर) यांच्यासह आयएनएस खुकरीचे अधिकारी आणि नौसैनिक यांच्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हे बेट सेंट्रल पोर्ट ब्लेअरच्या पूर्वेला तीन किलोमीटर अंतरावर आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान डिसेंबर 1943 मध्ये तेथे राष्ट्रीय तिरंगा फडकवला होता. या ऐतिहासिक घटनेच्या 75 व्या वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2018 रोजी रॉस बेटाचे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे नामकरण केले होते.
बेटाला भेट दिल्यानंतर, विजय ज्योत पुन्हा पोर्ट ब्लेअर जेट्टीवर आणण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित कर्मचाऱ्यांनी सर्व कोविड -19 नियमांचे पालन केले .